भगवंतासमोर सुदीप प्रज्वलित करुन ते त्याच्या चरणी अर्पण करणे हे अत्यंत पवित्र, उदात्त व श्रेयस्कर कर्म आहे. ग्रंथराजही सुस्पष्टपणे सांगतो की परमात्म्यास नऊ प्रकारचे थेंब आवडतात, त्यातील एक प्रकार म्हणजे श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजासमीप प्रज्वलित केलेल्या दीपातील तेलाचे, तुपाचे व मेणाचे थेंब. जेव्हा आम्ही ग्रंथराजासमीप किंवा भगवंतासमीप किंवा सदगुरुसमीप सुदीप प्रज्वलित करतो, तेव्हा हा भगवंत आमच्या जीवनाच्या वाटेवर प्रकाश निर्माण करत राहतो व त्यामुळे जरी अडचण आली तरी ती पार करुन जाण्याचा मार्ग मला सहजपणे दिसत राहतो. अडचणीच्या वेळी सुदीप अर्पण करण्याएवढेच महत्वाचे आहे, ते अडचण नसतानाही पुढील वाट प्रकाशित होत राहावी व अडचण येऊच नये यासाठी सातत्याने सुदीप अर्पण करावे.
आपल्या कळत नकळत आपल्याकडून अनेक चुका किंवा प्रज्ञापराध घडत असतात. यामुळे आपल्या जीवनात अनेक बाधा निर्माण होतात किंवा संकटे येतात. याउलट अनेकवेळा आपल्या जीवनात अनेक महत्वाच्या व आनंदाच्या घटना घडतात. अशावेळी सदगुरुंना हाक कशी मारायची किंवा त्याने केलेल्या कृपेसाठी त्याला धन्यवाद कसे द्यायचे ते कळत नाही म्हणून सुखाच्या व दुखाच्या दोन्ही वेळेस सदगुरुंबरोबर राहण्यासाठी हा अग्निनारायनाचे स्वरुप असणारा सुदीप आपल्यासाठी सहाय्यक आहे.
अग्निनारायण एकच आहे. पण भक्तांच्या भावानुसार तो वेगवेगळया सुदीप रुपांमध्ये कार्यकारी असतो.
* सुदीप चे प्रकार *
१.इच्छापूर्ती सुदीप : हा सुदीप आपल्या उचित व पवित्र इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा झाल्यावर श्रध्दावान अर्पण करतात. पवित्र व मंगल इच्छापूर्तीसाठी केल्या जाणा-या प्रयासाना बळ मिळावे यासाठी मनोमन प्रार्थनाही करतात.
२. बाधानिवारक सुदीप : जीवनात अनेक प्रकारच्या बाधा आपल्या जीवनास क्लेशमय बनवतात. या बाधांचा आपल्या जीवनातील प्रभाव दूर करण्यासाठी व असा प्रभाव कमी झाल्यावर श्रध्दावान बाधानिवारक सुदीप अर्पण करतात.
३. पीडानाशक सुदीप : दुष्प्रारब्धामुळे प्रापंचिक मानवास शारीरिक, मानसिक किंवा अन्य प्रकारच्या पीडा सतावत असतात. या पिंडामुळे त्या व्यक्तीचे तसेच त्याच्या कुटुंबाचे जीवन कष्टमय होते. या पिंडाचा नाश व्हावा यासाठी, तसेच पीडा निवारण झाल्यावर पीडानाशक सुदीप श्रध्दावान अर्पण करतात.
४. दर्शन सुदिप : पवित्र मार्गावरुन वाटचाल करण्याची इच्छा असूनही अनेक प्रकारच्या मोहांकडे मन ओढले गेल्याने मानवाला मर्यादामार्गावर चालणे कठीण होते. मनःसामार्थ्य प्राप्त व्हावे आणि देवयान पंथावरुन समर्थपणे प्रवास करता यावा यासाठी दर्शन सुदीप श्रध्दावान अर्पण करतात.
५. वाढदिवस सुदीप : वाढदिवसादिवशी आणि मागील वर्षात घडलेल्या मंगल घटनाप्रीत्यर्थ, तसेच कठीण प्रसंगी सदगुरुनी दिलेल्या आधाराबद्दल सदगुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची कृपा आयुष्यभर अशीच लाभत राहावी हि प्रार्थना करण्यासाठी जन्मदिन सुदीप श्रध्दावान अर्पण करतात.
६. स्वेच्छासंकल्प सुदीप : आपणास आवडेल, झेपेल असा उचित संकल्प करुन हा सुदीप श्रध्दावान अर्पण करतात. स्वतःच्या, आप्तांच्या, अपत्यांच्या क्षेमकुशलतेसाठी, विकासासाठी व संरक्षणासाठी संकल्प करुन श्रध्दावान प्रतिक स्वरुपात स्वेच्छासंकल्प सुदीप अर्पण करतात.
